मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानाच्या बाहेर हनुमान चालीसाचं पठण करण्याची घोषणा करणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी आपली भूमिका बदलली आहे. राणा दाम्पत्याविरोधात शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने मुंबईत काही ठिकाणी तणावाची स्थितीही निर्माण झाली होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यामुळे नवनीत राणा आणि रवी राणा यांनी ‘मातोश्री’ परिसरात जाण्याचं टाळलं.
रवी राणा यांनी पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. देशासाठी काम केलेल्या व्यक्तीला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देण्यात येणार आहे. यंदाचा हा पहिला पुरस्कार पंतप्रधान मोदी यांना जाहीर झाला असून पुरस्कार स्वीकारण्यासाठी नरेंद्र मोदी उद्या (रविवार) मुंबईत दाखल होणार आहेत. मोदींच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही आमची भूमिका मागे घेत आहोत, असं रवी राणा यांनी सांगितलं आहे.




