पुणे : पुण्यात रिक्षा चोरी करणाऱ्या सराईत चोराला बिबवेवाडी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस चोरीला गेलेल्या बजाज
ऑटो रिक्षाचा तसेच अज्ञात चोरट्याचा शोध घेत होते, यावेळी पोलिसांच्या खास बातमीदारामार्फत त्यांना खात्रीशीर माहीती मिळाली की, रिक्षा चोरी करणारा व्यक्ती हा धनकवडी सातारा रोड, पुणे येथील फर्निचरच्या दुकानामध्ये काम करतो.
पोलीस त्यानुसार शोध घेत होते, यावेळी हा चोर फर्निचरच्या दुकानामध्ये दिसला. त्याला पोलिसांनी त्याचे नाव आणि पत्ता विचारला. त्याने त्याचे नाव समीर दिलीप रेणुसे, (वय २२, रा.गणपतनगर, पापळवस्ती, बिबवेवाडी, पुणे. मुळगाव- मु. पो. साखर, ता. वेल्हा, जि. पुणे असे सांगितले. त्याच्याकडे दाखल गुन्ह्याविषयी व चोरी केलेल्या बजाज ऑटोरिक्षाविषयी तपास केला. तेव्हा तो उडवा-उडवीची व असमाधानकारक उत्तरे देवू लागला. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा कबुल केला.
पोलिसांनी त्याला अटक करुन पोलीस कस्टडी रिमांडवर घेतले. त्याने बिबवेवाडी पोलीस ठाणे हद्दीतुन आणखी 2 रिक्षा चोरी केल्याचे सांगितले, त्यामुळे तेथे दाखल असलेल्या गुन्ह्यातील चोरी गेलेल्या रिक्षा त्यानेच चोरलेल्या असल्याचे निष्पन्न झाले. तो या रिक्षाचे पार्ट काढुन विकणार असल्याने त्याने या रिक्षा आडबाजुस लावुन ठेवल्याचे त्याने सांगितले, त्याच्याकडुन 50,000/- रुपये किंमतीची एक ऑटोरिक्षा व वरील दोन गुन्हयातील 50,000 व 20,000 रुपये किंमतीच्या दोन रिक्षा अशा
एकुण 1,20,000/- किंमतीच्या रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. या गुन्हयाचा तपास पोलीस हवालदार शामराव लोहोमकर यांनी केला. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीची रवानगी येरवडा कारागृह येथे केली
आहे.
ही कामगिरी नम्रता पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-05 पुणे शहर आणि राजेंद्र गलांडे, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे शहर यांच्या मार्गदर्शनानुसार सुनील झावरे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बिबवेवाडी पोलीस ठाणे, पुणे शहर, अनिता हिवरकर, पोलीस निरीक्षक, गुन्हे यांच्या सुचनेनुसार तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे, पोलीस अंमलदार शामराव लोहोमकर, शिवाजी येवले, अतुल महांगडे यांनी केली आहे.




