मुंबई : मुंबईमधील ताडदेव भागातील एका २० मजली इमारतीच्या 19 व्या मजल्यावर सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. येथील नाना चौकातील गांधी रूग्णालयाच्या समोरील कमला बिल्डिंगला ही आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या १३ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, निवासी इमारतीच्या 19 व्या मजल्यावर अनेक रहिवासी झोपेत असताना सकाळी 7 च्या सुमारास ही आग लागली. प्रत्येक मजल्यावर किमान सहा फ्लॅट आहेत. दुपारी 12.25 च्या सुमारास आग आटोक्यात आली. जखमींपैकी सात जणांना बीएमसी संचालित नायर रुग्णालयात नेण्यात आले आहे, जेथे पाच जणांचा मृत्यू झाला, तर आणखी एकाचा कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला. जखमींना भाटिया रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पाच जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला तर २३ जणांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, मंत्री आदित्य ठाकरे यांनी शनिवारी दुपारी मुंबईतील कमला बिल्डिंगला भेट दिली. या आगीत आपल्या कुटुंबियांना गमावलेल्यांना राज्य सरकार 5 लाख रुपये भरपाई देईल, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील आग दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींना 50 हजारांची मदत दिली जाणार असल्याचे सांगितले आहे.




