पुणे : पुण्यात काँग्रेस कार्यकर्त्याची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चंद्रभागा चौक येथे घडली आहे. भरदिवसा ही घटना घडल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
समीर मनूर असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. समीर चहा पिण्यासाठी चंद्रभागा चौकात आला होता, यावेळी दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञातांनी त्याच्यावर सहा गोळ्या झाडल्या. त्यात समीरचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.
समीर मनूर यांची काँग्रेसच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली होती. आंबेगाव परिसरातील दत्तनगरमध्ये पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार संजय जगताप यांच्या हस्ते त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले होते.




