मुंबई : एन्काउंटर स्पेशालिस्ट माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) अटक केली आहे. एनआयएनं आज पहाटे शर्मा यांच्या घरावर धाड टाकली होती. त्यांची एनआयएच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु होती. चौकशी पूर्ण झाल्यानंतर प्रदीप शर्मा यांना एनआयएकडून अटक करण्यात आले आहे.
आज प्रदीप शर्मा यांच्या अंधेरीतल्या निवासस्थानी पहाटे एनआयएच्या टीमने धाड टाकली होती. सकाळी सहा वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत एनआयएने प्रदीप शर्मा यांच्या घराची झाडाझडती केली. त्यानंतर आज दुपारी शर्मा यांना अटक करण्यात आली आहे. सात तासांच्या चौकशीनंतर अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सहभाग आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोपांखाली प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली. त्यांना कोर्टात हजर करुन एनआयए कोठडीची मागणी करणार आहे. त्याआधी त्यांची वैद्यकीय चाचणी केली जाईल.
दरम्यान, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया निवास्थानाजवळ सुमारे अडीच किलो जिलेटीन ठेवलेली स्कॉर्पिओ कार सापडली होती. स्कॉर्पिओचे मालक असलेल्या मनसुख हिरेन यांच्या हत्याप्रकरणाचा तपासही एनआयएकडे आहे. प्रदीप शर्मा या दोन्ही प्रकरणात वाझे यांच्या संपर्कात होते.




