लखनौ : कॉंग्रेसला मोठा झटका बसला आहे. कॉंग्रेसचे दिग्गज आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय जितिन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी त्यांना दिल्लीतील भाजपा मुख्यालयात पक्षाचे सदस्यत्व मिळवून दिले. भाजपचे सदस्यत्व घेतल्यानंतर जितिन यांनी कॉंग्रेसवर टीका केली. ते म्हणाले की, आता फक्त भाजप पक्ष देशाच्या हितासाठी काम करीत आहे. उर्वरित पक्ष वैयक्तिक आणि प्रदेश-विशिष्ट झाले आहेत. राष्ट्रीय पक्षाच्या नावावर देशात कोणता पक्ष असेल तर तो फक्त भाजपाच आहे.
प्रसाद म्हणाले, ‘मी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि सर्व भाजप नेत्यांचे आभार मानतो. राजकीय जीवनातल्या एका नव्या अध्यायची ही सुरुवात आहे. गेल्या तीन पीढ्यांपासून माझी काँग्रेसशी जवळीक आहे. परंतु, मी खूप विचारमंथनानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मी कोणता पक्ष सोडला हा प्रश्न नाही. तर मी कोणत्या पक्षाकडे जात आहे आणि का? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. अशी प्रतिक्रिया भाजप प्रवेशानंतर जितीन प्रसाद यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले की, देशात खऱ्या अर्थानं संस्थात्मक राजकीय पत्र कोणता असेल तर तो भाजप आहे, हे मला गेल्या ८-१० वर्षांपासून जाणवत होतं. इतर पक्ष एखाद्या व्यक्तीचे किंवा क्षेत्राचे झाले आहेत. मात्र राष्ट्रीय पक्षाच्या नावावर भारतात जर कुठला पक्ष असेल तर तो भाजप आहे. आपला देश आज अनेक आव्हानांचा सामना करत आहे. या आव्हानांसमोर देशहितासाठी जर कोणता पक्ष आणि कोणता नेता मजबुतीनं उभा ठाकला असेल तर तो पक्ष भाजप आणि ती व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. आपल्या लोकांच्या हिताचं रक्षण करु शकत नाही किंवा त्यांच्यासाठी काम करू शकत नाही, अशा पक्षात राहण्यात काय अर्थ आहे, असा प्रश्न मला पडला होता. काँग्रेसमध्ये मला काहीही करता येत नव्हतं. गेली अनेक वर्ष काँग्रेस पक्षात मला मदत करणाऱ्या सर्व लोकांचे मी आभार मानतो. परंतु, यापुढे मात्र मी भाजपचा सच्चा कार्यकर्ता म्हणून काम करेन.




