जळगाव : भाजपाचे तालुका उपाध्यक्ष आणि एरंडोल तालुका शेतकी संघाचे संचालक राजेंद्र रायभान पाटील यांनी पत्नी आणि मुलीसह आत्महत्या केली आहे. त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दभाशी नजीकच्या पुलावरून तापी नदीत उडी घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या तिघांचे मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले आहेत. राजेंद्र रायभान पाटील (वय ५४), पत्नी वंदनाबाई राजेंद्र पाटील (वय ४८), मुलगी ज्ञानल राजेंद्र पाटील (वय २१) अशी मृतांची नावे आहेत.
राजेंद्र पाटील जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील भोद गावचे रहिवाशी होते. राजेंद्र पाटील, त्यांची पत्नी व मुलगी हे तिघे त्यांच्या इंडीका कारमध्ये सोमवारी (दि.१७) सकाळी अमळनेर तालुक्यातील भरवस येथे त्यांच्या सासरवाडीला गेले होते. तिकडून दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ते घरी परतण्यासाठी निघाले. मात्र, ते घरी पोहचलेच नाही. दरम्यान, संध्याकाळी त्यांची गाडी शिंदखेडा तालुक्यातील दभाशी गावाजवळ तापी नदीवर असलेल्या पुलावर दिसली. त्यानतंर काल (दि. १८) दुपारी ४ वाजता एक मृतदेह तापीत तरंगतांना आसपासच्या लोकांना दिसला.
जिल्हा बँकचे संचालक संजय पवार यांनी राजेंद्र पाटील यांची गाडी ओळखली. त्यानंतर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष पी. सी. आबा पाटील माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत राजेंद्र पाटील यांच्या मुलीचाही मृतदेह तरंगतांना दिसला. रात्र झाल्यामुळे या दोघांचे मृतदेह बाहेर काढता आले नाहीत. आज सकाळी हे मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले. आज सकाळी त्यांच्या पत्नीचा देखील मृतदेह तरंगताना आढळला. तिन्ही मृतदेह बाहेर काढून शिरपूर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.
राजेंद्र पाटील यांच्या सहकुटूंब आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही. राजेंद्र पाटील हे अतिशय संयमी म्हणून परिचित होते, त्यांनी पत्नी व मुलीसह आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल का उचलले असावे असे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. त्यांच्या कारमध्ये डेलीगेट या किटकनाशकाची बाटलीही सापडली आहे. मात्र ती उघडलेली नाही. त्यांची पत्नी वंदना या भोद ग्रामपंचायतीच्या सदस्य होत्या. मुलगी ज्ञानल धरणगाव महाविद्यालयात अंतिम वर्षात शिकत होती. त्यांचा मुलगा तेजस शेतकी संघात नोकरीला असल्याची माहिती मिळत आहे.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यावर कोणाचा दबाव? ‘त्या’ कथित गोळीबार प्रकरणाचं पुढे काय?
दोन मोटारसायकल समोरासमोर धडकून भीषण अपघात, दोघांचा मृत्यू




