महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अनेक विरोधी पक्षांनी आक्षेप नोंदवला असून सत्ताधाऱ्यांनी ईव्हीएममध्ये छेडछाड करून निवडणूक जिंकली असल्याचा आरोप केला जात आहे. निवडणूक आयोगाने मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजल्यानंतर ७५ लाखांहून अधिक मतदारांनी मतदान केल्याची माहिती दिली होती. तसेच, काही ठिकाणी रात्री ११.३० वाजेपर्यंत मतदान सुरू असल्याचेही सांगण्यात आले. या आकडेवारीवर विरोधकांनी शंका उपस्थित केली आहे.
या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीनेही निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी निवडणूक आयोगासमोर तीन महत्त्वाचे प्रश्न मांडले आहेत.
वंचित बहुजन आघाडीचे निवडणूक आयोगाला पत्र
वंचित बहुजन आघाडीने आपल्या पत्रात लिहिले आहे की, नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील काही गंभीर प्रश्नांवर आम्हाला स्पष्टता हवी आहे. या निवडणुकीतील प्रक्रियेवर आमचा विश्वास कमी झाल्याचे आम्ही मांडत आहोत. निवडणुका प्रलोभनमुक्त आणि पारदर्शक राहिल्या नसल्याचा आम्हाला संशय आहे. निवडणूक प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात विसंगती असल्याचे माजी मुख्य निवडणूक आयुक्तांनी देखील नमूद केले आहे.
२० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता मतदानाची टक्केवारी ५८.२२ होती, जी नंतर अचानक ६६.०५ टक्क्यांपर्यंत पोहोचली. या आकडेवारीतील मोठ्या फरकाबद्दल आम्हाला सखोल उत्तर हवे आहे.
मुख्य निवडणूक आयोगाला विचारलेले प्रश्न
१. एका मतदाराला मतदानासाठी लागणारा वेळ किती आहे?
२. २० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ५ ते ६ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची नोंद स्थानिक निवडणूक अधिकारी किंवा पर्यवेक्षकांनी केली आहे का? असल्यास, त्याचा तपशील द्यावा.
३. संध्याकाळी ५:५९ वाजता मतदान केंद्रावर उभ्या असलेल्या मतदारांना जारी केलेल्या टोकनची संख्या नोंदवली आहे का? असल्यास, त्याचा तपशील द्यावा.
संशयास्पद आकडेवारी
वंचित बहुजन आघाडीने आपल्या पत्रात म्हटले आहे की, “संध्याकाळी ५ ते रात्री ११.३० दरम्यान तब्बल ६५,९७,७०८ मतदानांची वाढ झाली. इतकेच नाही तर मतमोजणीच्या आधी पुन्हा ९,९९,३५९ मतांची वाढ झाल्याचा दावा करण्यात आला आहे. दोन दिवसांत एकूण ७५,९७,०६७ मतदानांची नोंद झाली. ही आकडेवारी फक्त आश्चर्यकारक नाही, तर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवरच शंका निर्माण करणारी आहे.”
निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासाची मागणी
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि प्रलोभनमुक्त असावी, हे सुनिश्चित करण्यासाठी आम्हाला या प्रश्नांची उत्तरं मिळणे अत्यावश्यक आहे. संपूर्ण महाराष्ट्र या उत्तरांची वाट पाहत आहे, असे वंचित बहुजन आघाडीने आपल्या पत्रात म्हटले आहे.




