कोलकाता : पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील हंसखली येथे एका वाढदिवसाच्या पार्टीत एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. पोलिसांनी रविवारी (10 एप्रिल) या संदर्भात माहिती दिली. त्याच वेळी, मुलीच्या कुटुंबीयांनी दावा केला की या प्रकरणातील मुख्य आरोपी तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) पंचायत सदस्याचा मुलगा आहे. ज्याला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आज सीएम ममता बॅनर्जी यांनी या घटनेबाबत धक्कादायक वक्तव्य केलं आहे. त्यांनी मुलीवर सामूहिक बलात्काराच्या कुटुंबाच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच “तुम्हाला कसे कळेल की मुलीवर बलात्कार झाला?” असे बेजबाबदार वक्तव्य केलं आहे.
भयंकर! सामूहिक बलात्कारामुळे 14 वर्षीय मुलीचा मृत्यू, TMC नेत्याच्या मुलाला अटक
ममता म्हणाल्या कि, तिच्यावर बलात्कार झाला होता, ती गरोदर होती की प्रेमप्रकरणात होती की आजारी होती हे कसं कळणार? जर हे जोडपे रिलेशनशिपमध्ये असेल तर आम्ही त्यांना कसे रोखू शकतो, यूपी नाही की मी लव्ह जिहादच्या नावाखाली हे करू शकते. याप्रकरणी बाल आयोग बलात्कार आणि हत्येची चौकशी करणार असल्याचं सीएम ममता यांनी म्हटलं आहे.
बंगालमधील नादिया येथे इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्याच्या पालकांनी घटनेच्या चार दिवसांनंतर शनिवारी (9 एप्रिल) आरोपींविरुद्ध हंसखली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, मुलगी सोमवारी (4 एप्रिल) आरोपीच्या घरी त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी होण्यासाठी गेली होती, परंतु ती आजारी अवस्थेत घरी परतली. कुटुंबीयांनी सांगितले की आमच्या मुलीला खूप रक्तस्त्राव होत होता आणि तिच्या पोटात खूप दुखत होते, आणि आम्ही तिला दवाखान्यात नेण्याआधीच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणात, कुटुंबाचा दावा आहे की आरोपी आणि त्याच्या मित्रांनी त्यांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केला होता. त्याचवेळी, कुटुंबीयांनी असाही आरोप केला आहे की तिच्या मृत्यूचे प्रमाणपत्र जारी होण्यापूर्वी काही लोकांनी तिच्या मृतदेहावर जबरदस्तीने अंत्यसंस्कार केले.
नादिया जिल्ह्यातील सामूहिक बलात्कार आणि अल्पवयीन मुलीच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका सोमवारी कोलकाता उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. आरोपी हा टीएमसीच्या पंचायत नेत्याचा मुलगा असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. याचिकाकर्त्यांचे वकील अनिंद्य सुंदर दास यांनी सांगितले की, सरन्यायाधीश प्रकाश श्रीवास्तव यांच्या न्यायालयाने या प्रकरणाची तातडीने सुनावणी घेण्याची परवानगी दिली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वकिलाने सांगितले की हे प्रकरण मंगळवारी कोर्टासमोर घेतले जाईल. दास म्हणाले की, आरोपी टीएमसीच्या पंचायत सदस्याचा मुलगा असल्याने या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती सीबीआयला करण्यात आली आहे. त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी सत्ताधारी पक्ष या प्रकरणात प्रभाव टाकू शकतो.
पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत मुलीच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे की, ती 4 एप्रिल रोजी नादिया जिल्ह्यातील हंसखली येथे आरोपीच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेली होती आणि तिच्यावर बलात्कार करण्यापूर्वी तिला अंमली पदार्थ पाजण्यात आले. पण यामध्ये ममता बॅनर्जी यांचे वक्तव्य प्रत्येक महिलेच्या आत्म्याला दुखावणारे आहे, त्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार आणि तिचा मृत्यू झाल्यानंतर ममता दीदी म्हणतात, “तुम्हाला कसे कळेल की मुलीवर बलात्कार झाला? ती गर्भवती होती का?” एका राज्याच्या मुख्यमंत्री असताना आणि त्याहीपेक्षा एक महिला असल्याने ममता दीदींचे हे विधान अल्पवयीन मुलीच्या मृत्यूची खिल्ली उडवणारे आणि न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या मृतांच्या कुटुंबीयांना दुखावणारे आहे.




