सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सकाळी पोहोचले. सांगवी येथील नुकसानीची पाहणी करून गावक-यांना दिलासा दिला.
बोरी नदीकाठी असलेल्या सांगवी खुर्द व सांगवी बुद्रूक या दोन्ही गावांना जोडणा-या पुलावर जाऊन मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टीने व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतीची व पडझड झालेल्या घरांची पाहणी केली. जेथून मुख्यमंत्री दोन्ही गावांच्या शिवारातील नुकसानीची पाहणी करणार होते, तेथे गावक-यांना प्रवेश नाकारण्यात आला होता.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पुलावर जाण्यापूर्वी गावच्या वेशीवर थांबून गावक-यांशी छोटेखानी संवाद साधला. गावक-यांची निवेदनेही त्यांनी स्वीकारली. अतिवृष्टीने व पुरामुळे झालेले नुकसान प्रचंड मोठे असून जगणेच अवघड झाले आहे, अशा शब्दांत गावक-यांनी आपली व्यथा मांडली. तेव्हा नुकसानभरपाई देण्यासाठी शासन खंबीर असून त्याप्रमाणे नुकसानभरपाई मिळणारच आहे. परंतु या संकटाशी सामना करताना गावक-यांनी धीर सोडू नये, जीवाचे बरेवाईट करून घेऊ नये, अशा शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिलासा देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अक्कलकोटच्या तहसीलदार अंजली मरोड यांच्याकडून नुकसानीच्या परिस्थितीची माहिती घेतली. त्यांच्या समवेत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादा भुसे, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे आदी उपस्थित होते.





