नवी दिल्ली : संसदेत प्रचंड गदारोळ झाल्यानंतर आणखी तीन खासदारांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे. हे खासदार आम आदमी पक्षाचे नेते सुशील गुप्ता तसेच संदीप पाठक आणि भुयान आहेत. या सर्वांना फक्त या आठवड्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. यानंतर सभागृहाचे कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
तत्पूर्वी, काँग्रेस नेते अधीर रंजन यांनी राष्ट्रपतींबाबत केलेल्या वक्तव्याला भाजपने लोकसभेत कडाडून विरोध केला. काँग्रेस आदिवासी आणि गरीब, महिलाविरोधी असल्याचे भाजपने म्हटले. अधीर रंजन यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल काँग्रेसनेच माफी मागावी, असे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या. यानंतर अधीर रंजन चौधरी यांनी आपली चूक झाल्याचे सांगितले. गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते.




