राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभेचं विशेष अधिवेशन सुरू होणार आहे. त्याआधी, विशेष अधिवेशनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी नव्या आमदारांनी आपली आमदारकीची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. विधानसभेच्या दुसऱ्या दिवशी हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी १०६ नव्या आमदारांना सदस्यपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते. यामध्ये शिंदे गट शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार आमश्या पाडवी यांनी देखील शपथ घेतली. मात्र, शपथ घेतताना त्यांना एकही शब्द वाचता न आल्यामुळे अध्यक्षांनी शपथ वाचून दाखवली आणि त्यानंतर ते एक एक शब्द मागून ती शपथ म्हणाले.
आमश्या पाडवी कोण आहेत?
आमश्या पाडवी हे मूळचे शिवसैनिक आहेत आणि शिवसेनेमध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांनी नंदूरबार जिल्ह्यात शिवसेनेचा ठसा निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण काम केलं आहे. हा भाग अत्यंत दुर्गम असला तरीही, साधनसामग्रीच्या अभावातही त्यांनी शिवसेना रुजवली आहे. ते नंदूरबार जिल्ह्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत. २०१४ आणि २०१९ मध्ये त्यांनी अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून आदिवासी विकास मंत्री केसी पाडवी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, पण दोन्ही वेळा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तरीही, २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी ८०,७७७ मते मिळवली होती. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी ४८०० मतांनी विजय मिळवला.




