देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असून अर्थव्यवस्थाही हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचा दावा सरकारकडून करण्यात येत आहे. तसंच जीएसटी आणि वाहन विक्री क्षेत्रात होत असलेल्या वाढीचं उदाहरणही दिलं जात आहे. दरम्यान, बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी यावर भाष्य केलं. “वाहन क्षेत्रातील विक्री पुन्हा पूर्वपदावर आल्याचं म्हटलं जात आहे. परंतु यासाठी अजूनही वाट पाहावी लागेल,” असं मत बजाज यांनी व्यक्त केलं. इंडिया टुडेला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं.
एप्रिल ते जून या कालावधीत थोड्याप्रमाणात वाहनांची विक्री झाली. विशेष करून दुचाकींची विक्री झाली नाही. आता हळूहळू दुचाकीची विक्री वाढच आहे. परंतु आताच या परिस्थितीची तुलना गेल्या वर्षातील विक्रीशी करता येणार आहे. जुलै महिन्यापासून पुढील वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंतच्या विक्रीची आकडेवारी पाहावी लागेल. त्यानंतरच चित्र स्पष्ट होईल, सध्या सणासुदीचा कालावधी आहे. काही ग्राहक दुचाकी खरेदी करतही आहेत. काही लोक असेही असतात जे सणासुदीच्या कालावधीत वाहन खरेदी करण्याची वाट पाहत असतात. अशातच सणासुदीच्या कालावधीत झालेल्या विक्रीची संपूर्ण महिन्याशी तुलना करणं अयोग्य ठरेल. त्यासाठी आपल्याला थोडी वाट पाहावी लागेल,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
संपूर्ण जग हे करोनाच्या संकटात सापडलं आहे. अनेक देशांमध्ये या कालावधीत त्या त्या क्षेत्रांना सरकारकडून मदत मिळाली. परंतु आपल्याकडे तसं काहीही झालं नाही. या कालावधीत मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांवरही गदा आली. परंतु ही परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी वेळ लागेल, दुचाकी क्षेत्राला पुन्हा उभारी देण्याचे प्रयत्न केले जात आहेत. लॉकडाउनच्या कालावधीत पुरवठ्यावर परिणाम झाला होता. त्यानंतर चीनसोबत असलेल्या संघर्षाचाही परिणाम दिसू लागला. दुचाकीसाठी लागणारे टायर्सचा पुरवठा हा चीनमधूनच केला जातो,” असंही बजाज म्हणाले.