Navjot Sidhu Case : काँग्रेस नेते नवज्योत सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. रोड रेज प्रकरणी त्यांना 1 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी आपल्या पूर्वीच्या आदेशात बदल केला आहे. यापूर्वी सिद्धू यांना केवळ 1000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. रोडरेजचे हे प्रकरण 1988 चे आहे. त्यावेळी सिद्धूच्या हातून मारहाण झाल्यानंतर एका वृद्धाचा मृत्यू झाला होता.
सुप्रीम कोर्टाने 2018 मध्ये दिलेल्या निर्णयात सिद्धूला केवळ आयपीसीच्या कलम 323 अंतर्गत प्राणघातक हल्ल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. पुनर्विलोकन याचिका स्वीकारताना न्यायालयाने म्हटले होते की, केवळ या कलमात शिक्षा वाढवण्याच्या मागणीचा विचार केला जाईल. आता या कलमात कोर्टाने सिद्धूला कमाल 1 वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू यांनी प्रतिक्रिया दिली असून मी कायद्याचे पालन करेन, असं ते म्हणाले आहेत.
Will submit to the majesty of law ….
— Navjot Singh Sidhu (@sherryontopp) May 19, 2022
काय आहे प्रकरण?
1988 मध्ये पंजाबमधील पटियाला येथे झालेल्या या घटनेत गुरनाम सिंग यांचा मृत्यू झाला होता. सिद्धू आणि त्याचा मित्र कंवरसिंग संधू यांना पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाने तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. पण जुलै 2018 मध्ये सुप्रीम कोर्टाने संधूची पूर्णपणे निर्दोष मुक्तता केली. तर सिद्धूला केवळ प्राणघातक हल्ल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आणि केवळ एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
याविरोधात गुरनाम सिंग यांच्या कुटुंबीयांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली होती. 13 सप्टेंबर 2018 रोजी न्यायालयाने याचिका विचारार्थ स्वीकारली. मात्र त्यानंतर केवळ शिक्षेत वाढ करण्याच्या मागणीवरच विचार करणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते.




