पटियाला : 1988 च्या रोड रेज प्रकरणात दोषी ठरलेले पंजाब काँग्रेसचे माजी प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू हे पटियाला सेंट्रल जेलमध्ये लिपिक म्हणून काम करतील. सिद्धू यांना तीन महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाईल आणि न्यायालयीन निकालांची संक्षिप्त माहिती कशी द्यावी आणि तुरुंगातील नोंदी कशा संकलित करायच्या हे शिकवले जाईल.
जेल नियमावलीनुसार सिद्धू यांना पहिल्या 90 दिवसांसाठी पैसे दिले जाणार नाहीत. त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर, त्यांना दररोज 40 ते 90 रुपये मजुरी मिळण्याचा हक्क असेल. त्यांच्या कौशल्याच्या आधारे त्यांचे वेतन ठरवले जाईल आणि कमाई त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. तुरुंग अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, नवज्योत सिद्धू हे हाय-प्रोफाइल कैदी असल्याने बॅरेकमधूनच काम करेल. जेलच्या फायली त्यांच्या बॅरेकमध्ये पाठवल्या जातील, कारण त्यांना त्यांच्या सेलमधून बाहेर पडू दिले जाणार नाही.
तुरुंग प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सिद्धू यांनी मंगळवारी लिपिक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. सकाळी 9 ते दुपारी १२ आणि दुपारी 3 ते 5 अशा दोन शिफ्टमध्ये ते काम करणार आहेत. दरम्यान, सिद्धू यांना ज्या बॅरेकमध्ये ठेवण्यात आले आहे त्या बॅरेकमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. पाच वॉर्डन आणि चार तुरुंगातील कैद्यांनाही सिद्धूवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.
क्रिकेटर-राजकारणी नवज्योतसिंग सिद्धू यांना १९ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने 1988 च्या रोड रेज प्रकरणात एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्यांनी 20 मे रोजी पटियाला येथील ट्रायल कोर्टासमोर आत्मसमर्पण केले. दरम्यान, लठ्ठपणा आणि चयापचय विकाराचे निदान झालेल्या नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासाठी एका वैद्यकीय मंडळाने आहार चार्ट तयार केला. डाएट चार्ट अजून जेलपर्यंत पोहोचलेला नाही. सिद्धू सलाड आणि फळांच्या आहारावर जगत आहेत. आपल्याला गव्हाची ऍलर्जी असल्याचे सांगत त्यांनी डाळ रोटी खाण्यास नकार दिला होता.




