नवी दिल्ली : देशाची राजधानी नवी दिल्लीत एक अतिशय भयंकर घटना घडली आहे. सोमवारी मालवीय नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जन्मदात्या आईनेच आपल्या मुलीची हत्या केली. तिने आपल्या दोन महिन्यांच्या मुलीची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह ओव्हनमध्ये टाकला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. मात्र, तोपर्यंत खूपच उशिर झाला होता. पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलशन कौशिक हा त्याची पत्नी डिंपल, चार वर्षांचा मुलगा आणि दोन महिन्यांच्या मुलीसह राहत होता. डिंपलने मुलाच्या हव्यासापोटी हे धक्कादायक पाऊल उचललं असल्याची माहिती मिळाली आहे. सोमवारी तिनं आपल्या दोन महिन्यांच्या मुलीचा गळा आवळला. त्यानंतर तिला ओव्हनमध्ये टाकलं. दिल्ली पोलिसांना सोमवारी दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास चिराग गावातून मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी चिमुकलीचा शोध सुरू केला. बराच वेळ शोध घेतल्यानंतर पोलिसांनी ओव्हन उघडून बघितले. त्यातील दृश्य बघून पोलीसदेखील हादरले. त्यांना ओव्हनमध्ये दोन महिन्यांच्या चिमुकलीचा विघटित झालेला मृतदेह दिसला.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. त्यानंतर पोलिसांनी मृत मुलीच्या आई-वडिलांना ताब्यात घेतलं आहे. तसेच या हत्येतील मुख्य गुन्हेगाराशिवाय अन्य कोणी गुन्हेगार आहेत का, याचाही तपास पोलीस करत आहेत.




