भोपाळ : ट्रेनमध्ये एका तरुणीवर बलात्काराची घटना समोर आली आहे. यशवंतपूरहून हजरत निजामुद्दीनला जाणाऱ्या ट्रेनच्या पॅंट्री कारमध्ये एका विक्रेत्याने या तरुणीवर बलात्कार केला. शुक्रवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे रात्री 12.25 च्या सुमारास भोपाळ स्थानकात पोहोचलेल्या ट्रेनमधून उतरलेल्या पीडितेने सांगितले. या घटनेनंतर ही ट्रेन स्टेशनवर सुमारे अर्धा तास थांबून एक वाजता हजरत निजामुद्दीनकडे रवाना झाली. पोलिसांनी संशयाच्या आधारे ट्रेनमधील काही विक्रेत्यांना चौकशी आणि ओळख पटवण्यासाठी ताब्यात घेतले आहे.
जीआरपी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संपर्कक्रांती एक्स्प्रेसमध्ये एका तरुणीचा विनयभंग झाल्याची तक्रार मिळाली होती. ट्रेन स्टेशनवर थांबताच पीडित तरुणीला तिच्या सुरक्षेसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. यासोबतच संशयाच्या आधारे ट्रेनमधील अनेक विक्रेत्यांना पकडून तरुणीकडून आरोपीची ओळख पटवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
तर दुसरीकडे ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी तरुणीची प्रकृती ठीक नसल्याचे सांगितले. तिला नीट काही सांगताही येत नव्हते. पँट्री कारमध्ये तिच्यावर बलात्कार झाल्याचे ती पोलिसांना सांगत होती. या प्रकरणाचा तपास करत असलेले एएसआय आरसी इनवती यांनी सांगितले की, पीडित तरुणी घाबरलेली आहे. तिला उपचारासाठी पाठवण्यात येत आहे. ती कुठे जात होती हे देखील तिला सांगता येत नाही. तसेच तिच्यासोबत इतर कोणीही नव्हते आणि तिचे सामान सापडले नाही.




