मधुमेह, उच्च रक्तदाब, जीवनसत्त्वे, कॅल्शियम D3 सप्लिमेंट्स, मुलांमध्ये बॅक्टेरियाचा संसर्ग, ऍसिड रिफ्लक्स आणि पोटातील संसर्गासाठी दिली जाणारी अनेक औषधे भारताच्या औषध नियामक, CDSCO द्वारा ऑगस्टमध्ये घेतलेल्या गुणवत्ता चाचण्यांमध्ये गुणवत्ता मानकांची पूर्तता करण्यात अपयशी ठरली आहेत.
भारताच्या सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने (CDSCO) तपशीलवार अहवाल प्रसिद्ध केला होता. या अहवालात, देशभरात सामान्यतः वापरली जाणारी अनेक महत्त्वाची औषधे गुणवत्तेच्या चाचणीत अपयशी ठरल्याचे आढळून आले. या औषधांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, ऍसिड रिफ्लक्स, व्हिटॅमिन आणि कॅल्शियम सप्लिमेंट्स, तसेच बॅक्टेरियाच्या संसर्गावर उपचार करण्यासाठी मुलांना दिली जाणारी प्रतिजैविके यांचा समावेश होता. अहवालानुसार, या औषधांना NSQ घोषित करण्यात आले आहे (गुणवत्तेच्या मानकांना अनुरूप नाहीत).
ही औषधे चाचणीत अपयशी :
पॅरासिटामोल गोळ्या (५०० mg):
सौम्य ताप असल्यास आणि पेन किलरप्रमाणे वापरतात, हा सहसा प्रथमोपचाराचा एक भाग असतो आणि हे औषध सामान्यतः प्रत्येक घरात आढळते.
ग्लाइमेपीराइड :
हे मधुमेहविरोधी औषध आहे, जे मधुमेहाच्या उपचारात वापरले जाते. हे अल्केम हेल्थने तयार केले होते.
टेलमा एच (टेलमिसर्टन 40 मिग्रॅ):
ग्लेनमार्कचे हे औषध उच्च रक्तदाबाच्या उपचारात दिले जाते. हे औषध चाचणीत बिलो स्टॅंडर्ड ठरले आहे.
पॅन डी
ॲसिड रिफ्लक्सच्या उपचारासाठी दिले जाणारे हे औषध गुणवत्तेच्या चाचणीत अपयशी ठरले. हे अल्केम हेल्थ सायन्सने तयार केले आहे.
शेलकल C आणि D3 कॅल्शियम सप्लिमेंट :
प्युअर अँड क्युअर हेल्थकेअरने उत्पादित केलेले आणि टोरेंट फार्मास्युटिकल्सने वितरीत केलेले शेलकल चाचणीतील मानकांची पूर्तता करत नाही.
Clavam 625:
हे एक प्रतिजैविक औषध आहे.
Sepodem XP 50 Dry Suspension:
मुलांमधील गंभीर जीवाणूंच्या संसर्गावर उपचार करण्यासाठी दिले जाणारे हे औषध हैदराबादच्या हेटेरो कंपनीने तयार केले आहे.
पल्मोसिल (इरेक्टाइल डिसफंक्शनसाठी):
सन फार्मा द्वारे निर्मित, हे औषध इरेक्टाइल डिसफंक्शनच्या उपचारांसाठी दिले जाते.
पॅन्टोसिड (ऍसिड रिफ्लक्ससाठी):
ॲसिडिटी आणि रिफ्लक्सच्या उपचारासाठी वापरण्यात येणारे सन फार्माचे हे औषधही अयशस्वी ठरले.
Ursocol 300:
सन फार्माचे हे औषधही गुणवत्तेच्या निकषांवर खरे उतरले नाही.
Defcort 6:
संधिवात उपचारात दिले जाणारे मॅक्लिओड्स फार्माचे हे औषध गुणवत्तेच्या चाचणीत अपयशी ठरले.
कंपन्यांची प्रतिक्रिया :
या औषधांचे चाचणी अहवाल आल्यानंतर संबंधित कंपन्यांनी उत्तरे दाखल केली आहेत, ज्यात त्यांनी दावा केला की अहवालात नमूद केलेल्या बॅचेस त्यांनी तयार केल्या नाहीत आणि ही उत्पादने बनावट असू शकतात. याप्रकरणी तपासाच्या निकालाची वाट पाहत असल्याचेही कंपन्यांनी सांगितले.
CDSCO ने काय सांगितले?
सीडीएससीओने सांगितले की, हा अहवाल बनावट औषधांच्या निर्मितीच्या तपासाच्या निकालांवर अवलंबून आहे. सध्या, नियामक एजन्सी ही औषधे खरोखरच बनावट स्वरूपात बाजारात आणली गेली आहेत की मानकांचे उल्लंघन करून तयार केली गेली आहेत याचा शोध घेत आहे. या तपासणीचे निकाल येईपर्यंत ही औषधे बाजारात विकण्यास बंदी घालण्यात आली नसून, संबंधित कंपन्यांना मात्र आवश्यक ती पावले उचलण्यास नियामकाने सांगितले आहे.
संभाव्य धोके काय आहेत?
गुणवत्तेच्या मानकांमध्ये अयशस्वी होणारी औषधे रुग्णांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण करू शकतात. जर बनावट औषधे बाजारात येत असतील तर त्याचा परिणाम केवळ वैद्यकीय उपचारांवरच होतो असे नाही तर देशातील आरोग्य सेवेवरही मोठे प्रश्न उपस्थित होतात. CDSCO द्वारे करण्यात येत असलेल्या तपासामुळे या समस्येचे गांभीर्य अधोरेखित होते आणि भविष्यात फार्मास्युटिकल उद्योगावर काटेकोरपणे देखरेख ठेवण्याची गरज असल्याचे अधोरेखित होते.