उत्तरप्रदेश : उत्तरप्रदेशमध्ये सुरु असलेल्या महाकुंभ मेळ्यादरम्यान आगीची दुर्दैवी घटना घडली आहे. गुरुवारी महाकुंभ मेळ्याच्या बाहेरील बाजूस बांधलेल्या टेंट सिटीमध्ये भीषण आग लागली आहे. झुंसी येथील छतनाग घाटातील नागेश्वर घाट सेक्टर २२ जवळ आग लागल्याची माहिती आहे. या आगीत सुमारे १५ तंबू जळून खाक झाले आहेत. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे कारण अद्याप समजलेले नाही.
महाकुंभ मेळ्यादरम्यान गुरुवारी दुपारी १५ तंबूंना आग लागल्याची माहिती पोलिसांनी दिली. रस्ता चांगला नसल्याने घटनास्थळी पोहोचायला थोडा विलंब झाल्याचेही त्यांनी सांगितले. हे तंबू परवानगीशिवाय उभारण्यात आल्याचे समोर आले असून ही माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात कळवण्यात आली आहे. याआधी १९ जानेवारीलाही महाकुंभा मेळ्यादरम्यान भीषण आग लागल्याची घटना घडली होती. यामध्ये गीता प्रेसच्या छावणीसह मोठ्या प्रमाणात तंबू जळून खाक झाले होते. काल चेंगराचेंगरीची घटना घडल्याने लोकांमध्ये खळबळ उडाली होती.