अक्साई चीनमध्ये PLA ने ५० हजार सैनिक सज्ज ठेवले आहेत. चीनच्या या आक्रमकतेला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराने दौलत बेग ओल्डी येथे मिसाइल डागणाऱ्या T-90 रणगाड्यांची स्क्वाड्रन, सैन्य वाहने आणि चार हजार सैनिकांची तुकडी तैनात केली आहे. शक्सगाम-काराकोरम पास एक्सिसवरुन चीनने कुठलीही आगळीक केल्यास त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने ही तयारी केली आहे.
काराकोरमच्या दक्षिणेला आणि चीप-चाप नदीच्या किनाऱ्याजवळ दौलत बेग ओल्डी येथे १६ हजार फूट उंचीवर भारताची शेवटची चौकी आहे. लष्कराच्या कमांडर्सनी विशेष उपकरणे वापरुन नदी, नाल्यांच्या वाटे हे रणगाडे दौलत बेग ओल्डीच्या शेवटच्या चौकीपर्यंत पोहोचवले.
भारतीय लष्कराचे चीनच्या रणगाडे, एअर डिफेन्स, रडार्स आणि जमिनीवरुन हवेत डागली जाणारी मिसाइल यावरही बारीक लक्ष आहे. तणावाची स्थिती कायम आहे.




