राज्यसभेतील ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचा राज्यसभेतील कार्यकाळ आज पूर्ण झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतर पक्षांच्या नेत्यांनी गुलाम नबी आझाद यांचे कौतुक केले. आझाद यांनीही सर्वांचे आभार मानले आणि त्यांच्या दीर्घ राजकीय कारकिर्दीतील अनुभवांचे काही किस्से सांगितले.
जम्मू भागातून आलेल्या गुलाम नबी आझाद यांनी सांगितले की त्यांनी महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि मौलाना आझाद यांचे वाचन करून देशभक्ती शिकली आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांचे आभार मानताना आझाद म्हणाले की त्यांच्यामुळेच मी येथे पोहोचू शकलो. त्यांनी यावेळी पाकिस्तानबद्दल आपले मत व्यक्त केले.
आझाद यांनी सभागृहात सांगितले की, “मी काश्मीरमधील सर्वात मोठ्या एसपी महाविद्यालयात शिकत असे. तेथे 14 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट दोन्ही साजरे करण्यात आले. 14 ऑगस्ट (पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन) साजरा करणार्यांची संख्या जास्त होती. मी आणि माझ्या काही सहका्यांनी 15 ऑगस्ट साजरा केला आणि तिथे फार कमी लोक होते. पण त्यानंतर आम्ही एक आठवडाभर महाविद्यालयात जात नसायचो, कारण तेथे मारहाण व्हायची. त्या काळातुन बाहेर पडत आम्ही येथे पोहोचलो आहोत.
आझाद म्हणाले कि, “मी त्या भाग्यवान लोकांपैकी एक आहे जे कधीच पाकिस्तानात गेले नाहीत, परंतु तेथे कोणत्या प्रकारची परिस्थिती आहे, याबद्दल वाचलं की मग मला अभिमान वाटतो की आपण भारतीय मुस्लिम आहोत.” जगातील एखाद्या मुसलमानाला जर अभिमान वाटला पाहिजे, तर भारतातील मुसलमानाला वाटायला पाहिजे.
आझाद म्हणाले की, गेल्या 3०-35 वर्षांत अफगाणिस्तान ते इराक पर्यंत, काही वर्षांपूर्वी पाहिलं, तर मुस्लिम देश एकमेकांशी भांडण करत संपत आहेत. तिथे कोणी हिंदू किंवा ख्रिश्चन नाही, ते आपापसांतच भांडत आहेत. आझाद म्हणाले की, पाकिस्तानच्या समाजात ज्या वाईट गोष्टी आहेत, त्या आपल्या मुस्लिमांमध्ये कधीही येऊ नयेत.
गुलाम नबी आझाद म्हणाले की, मुख्यमंत्री झाल्यानंतर मी सोपोर येथे पहिली जणसभा घेतली, तेथून गिलानी साहेब तीन वेळा आमदार म्हणून निवडले आले होते. त्या बैठकीत मी म्हणालो होतो की जर माझ्या सरकारमधील मंत्री धर्म किंवा मशिदी किंवा पक्षाच्या आधारे न्याय करत असतील, तर मला याची लाज वाटेल कि, असा मंत्री किंवा अधिकारी माझ्याबरोबर काम करत आहे.




