नवी दिल्ली : मनी लाँड्रिंग प्रकरणात तिहार तुरुंगात बंद असलेले आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांना जामीन मिळालेला नाही. दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांना राऊस एव्हेन्यू कोर्टाने मोठा झटका दिला आहे. दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांच्या जामीनाला ईडीने राऊस एव्हेन्यू कोर्टात विरोध केला होता. सत्येंद्र जैन यांना जामीन देण्याचे कोणतेही कारण नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
ईडीने ३० मे रोजी मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) फौजदारी कलमांतर्गत जैन यांना अटक केली होती. ते आता न्यायालयीन कोठडीत आहे. एजन्सी जैन यांच्याविरुद्ध कथित हवाला डीलसाठी पीएमएलए अंतर्गत तपास करत आहे. ईडीने याप्रकरणी अलीकडेच दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या ठिकाणावरही छापे टाकले होते. एकूण 7 ठिकाणी छापे टाकण्यात आले, ज्यामध्ये प्रकाश ज्वेलर्सकडे 2.23 कोटींची रोकड सापडली आहे. याशिवाय वैभव जैनकडे 41.5 लाख रोख 133 सोन्याची नाणी सापडली आहेत. तर प्रुडेन्स स्कूलचे चेअरमन जीएस मथारू यांच्याकडून २० लाखांची रोकड मिळाली.
एप्रिलमध्ये, ईडीने जैन यांच्या कुटुंबाची 4.81 कोटी रुपयांची मालमत्ता आणि त्यांच्या मालकीच्या आणि नियंत्रित कंपन्यांची मालमत्ता जप्त केली होती. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी जैन यांना खूप प्रामाणिक देशभक्त म्हणत त्यांना खोट्या प्रकरणात गोवले जात आहे, असे म्हटले आणि तपासात सर्व काही स्पष्ट होईल, अशी अशा व्यक्त केली.




