बिहारच्या मुंगेर जिल्ह्यात भाजपच्या प्रदेश प्रवक्त्याला भरदिवसा गोळ्या घालण्यात आल्या आहेत. त्यानंतर आरोपी तेथून फरार झाले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. अजफर शम्सी असे या नेत्याचे नाव आहे. आज सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली.
मुंगेरच्या इवनिंग कॉलेजजवळ दबा धरून बसलेल्या मारेकऱ्यांनी भाजपचे प्रदेश प्रवक्त अजफर शम्सी यांच्यावर गोळ्या झाडल्या. शम्सी यांना दोन गोळ्या लागून ते गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच, भाजपचे प्रदेश अध्यक्ष डॉ. संजय जयसवाल यांनी बिहारचे डीजीपी एस. के. सिंघल यांच्याशी चर्चा केली. आरोपींना अटक करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
शम्सी हे मुंगेरच्या जमालपूर कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत. ते आपल्या कारमधून कॉलेजला जात होते. ते कॉलेजच्या गेटवर पोहोचले आणि चालकाला कार पार्क करण्यास सांगितले. चालक कार पार्क करत असतानाच, दोनदा गोळीबार झाल्याचा आवाज आला. गोळ्या लागल्याने शम्सी जमिनीवर कोसळले. शम्सी यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एक गोळी शम्सी यांच्या कानाजवळ आणि दुसरी पोटात लागली. सध्या त्यांना उपचारासाठी पटना येथे हलविण्यात आले आहे. या हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा तपास करत आहे.




