तामिळनाडू : तामिळनाडूतील तंजावर जिल्ह्यात मंदिराच्या रथयात्रेदरम्यान मोठी दुर्घटना घडली. बुधवारी पहाटे रथ विजेच्या तारेखाली आल्याने अकरा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. या अपघातात 15 जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी या घटनेबाबत शोक व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. ते आज सकाळी 11.30 वाजता तंजावरला पोहोचतील, तिथे ते परिस्थितीचा आढावा घेतील आणि जखमींची भेट घेतील.
मिळालेल्या माहितीनुसार, तंजावरच्या कालीमेडू मंदिरात ९४ वा उच्च गुरुपूजा उत्सव साजरा केला जात आहे. त्यात सहभागी होण्यासाठी मंगळवारी रात्रीपासूनच नागरिकांची गर्दी होऊ लागली होती. रथयात्रा एका वळणावरून जात असताना रथावर उभे असलेले लोक हाय व्होल्टेज वायरच्या कचाट्यात सापडले. 9 फूट उंचीचा रथ फुलांनी आणि रोषणाईने सजवण्यात आला होता. रथाचे दिवे लावण्यासाठी जनरेटरही जोडण्यात आला होता. जखमींमध्ये जनरेटर ऑपरेटरचाही समावेश आहे.
एफआयआर नोंदवण्यात आला असून तपास सुरू आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, कोणतीही विपरीत घटना टाळण्यासाठी मंदिराकडे जाणारा वीजपुरवठा सहसा बंद केला जातो. यावेळी रथाची उंची हायव्होल्टेज लाईनला स्पर्श करण्याएवढी नसल्याने यावेळी वीजपुरवठा बंद करण्यात आला नाही. मात्र, रथावरील उपकरणांमुळे त्याची उंची वाढल्याने हा अपघात झाला, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.




