लखनौ : एका इमारतीत सिलिंडरचा स्फोट होऊन भीषण दुर्घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात मंगळवारी रात्री झालेल्या या स्फोटात सात जणांना आपला जीव गमवावा लागला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये २ पुरुष, २ महिला आणि ३ लहान मुलांचा समावेश आहे. जखमींवर जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केले आणि त्यानंतर त्यांना लखनऊच्या ट्रामा सेंटरमध्ये हलवण्यात आलं.
मिळालेल्या माहितीनुसार, टिकरी गावातील रहिवासी असलेल्या नुरुल हसन यांच्याजवळ फटाके बनवण्याचा परवाना होता. मंगळवारी रात्री ११ वाजल्याच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरात हा स्फोट झाला. हा स्फोट इतका भयंकर होता की त्यात दोन घरं कोसळली. या मलब्याखाली १४ लोक अडकले होते. उत्तर प्रदेशच्या ११२ या हेल्पलाईन क्रमांकावर दुर्घटनेची सूचना वझिरगंज पोलिसांना मिळाली. त्यानंतर गावकरी आणि पोलिसांनी या लोकांना बाहेर काढलं. परंतु, त्यातील सात जणांचा मृत्यू झाला होता.
पोलीस महानिरीक्षक राकेश सिंह यांनी स्फोटाचं नेमकं कारण शोधून काढण्यासाठी फॉरेन्सिक टीमला बोलावण्यात आल्याची माहिती दिली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं. त्यांनी अधिकाऱ्यांना तत्काळ घटनास्थळी पोहचून मदत आणि बचावकार्य पूर्ण करण्याचे निर्देश दिले. या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.
महाराज जी ने घायलों का समुचित उपचार कराने के निर्देश देते हुए जिलाधिकारी को दुर्घटना के कारणों की जांच कराकर आख्या उपलब्ध कराने के लिए भी आदेशित किया है।
— Yogi Adityanath Office (@myogioffice) June 2, 2021




