जालना : डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे एका महिलेने आपला जीव गमावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जालना शहरातील एका खासगी रुग्णालयात प्रसूतीनंतर 26 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, याप्रकरणी पोलिसांनी स्त्रीरोग तज्ज्ञाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सरकारी डॉक्टरांच्या समितीने निष्काळजीपणाला दोषी धरल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या औरंगाबादच्या शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या (GHMC) वरिष्ठ डॉक्टरांच्या समितीच्या अहवालाचा संदर्भ देत एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, डॉक्टर या महिलेला अननुभवी परिचारिकांकडे सोडून मॉर्निंग वॉकसाठी निघून गेले होते.
नेहा लिधोरिया या महिलेला प्रसूतीसाठी 13 एप्रिल 2022 रोजी जालना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिने एका निरोगी मुलाला जन्म दिला. 13 एप्रिल रोजी सकाळी प्रसूतीनंतर तिच्या शरीरात रक्ताची तीव्र कमतरता निर्माण झाली होती. डॉक्टर तिला अननुभवी परिचारिकांच्या हातात सोडून मॉर्निंग वॉकसाठी निघून गेले. डॉक्टर आणि परिचारिकांनी महिलेला रक्ताची गरज असल्याचे सांगितले नाही. परिणामी, नेहाचा 13 एप्रिल रोजी बाळंतपणानंतर प्रसुतिपश्चात रक्तस्त्राव (पीपीएच) किंवा जास्त रक्त कमी झाल्यामुळे मृत्यू झाला.
डॉक्टरांनी महिलेची स्थिती आणि रक्ताची आवश्यकता याबद्दल योग्य माहिती दिली नाही. परिणामी, रक्त खूपच कमी झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला.” रुग्णाच्या पतीने सरकारी जिल्हा रुग्णालयात तक्रार दाखल करून पत्नीच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली. त्यानंतर तक्रार GHMC समितीकडे पाठवण्यात आली. भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४ (निष्काळजीपणाने मृत्यू) अंतर्गत स्त्रीरोगतज्ञाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. अधिक तपास सुरू आहे.




