रायगड/पुणे : पुण्याहून कोकणात फिरायला निघालेल्या तरुणांचा थार एसयूव्हीसह (MH12 YN 8004) ५०० फूट खोल दरीत पडून भीषण अपघात झाला असून, सहा तरुणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा हृदय पिळवटून टाकणारा प्रकार रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात उघडकीस आला.
उत्तमनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात सोमवार, १७ नोव्हेंबर, मध्यरात्रीनंतर घडला असावा. मात्र, तरुणांच्या पालकांनी मुलं बेपत्ता झाल्याची तक्रार केल्यानंतर याबाबत शोधमोहीम सुरू झाली.
गाडीत प्रवास करणारे तरुण :
- शहाजी चव्हाण (२२), कोंढवे धावडे, पुणे
- पुनीत सुधारक शेट्टी (२०), कोपरे गाव, उत्तमनगर, पुणे
- साहिल साधू बोटे (२४), कोपरे गाव, उत्तमनगर, पुणे
- श्री महादेव कोळी (१८), कोपरे गाव, भैरवनाथ नगर, पुणे
- ओंकार सुनील कोळी (१८), कोपरे गाव, भैरवनाथ नगर, पुणे
- शिवा अरुण माने (१९), कोपरे गाव, भैरवनाथ नगर, पुणे)
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशन ट्रॅकिंगच्या आधारे शोध सुरू केला. अखेर गुरुवार, २० नोव्हेंबर रोजी ड्रोनच्या मदतीने शोध घेत असताना ताम्हिणी घाटातील एका तीव्र वळणाजवळ दरीत कोसळलेली थार आणि चार मृतदेह आढळले. उर्वरित दोन मृतदेहांचा शोध सुरू आहे.
या मोहिमेत माणगाव पोलीस, रायगड आपत्ती व्यवस्थापन पथक, मुळशी तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती, स्थानिक ग्रामस्थ सक्रिय सहभाग घेत आहेत. परंतु, तीव्र उतार, घनदाट जंगल आणि दरीची प्रचंड खोली यामुळे बचावकार्य अत्यंत धोकादायक ठरत आहे.
प्राथमिक तपासानुसार, ही थार गाडी पुण्याहून कोकणात जाताना कोंडेथर गावाजवळील एका तीव्र वळणावरून घसरून दरीत कोसळली. ताम्हिणी घाटात अशा अपघातांची वारंवार पुनरावृत्ती होते. घाटातील लोखंडी संरक्षणरेलिंग अत्यंत कमजोर आणि अपुरे असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते प्रमोद बलकवडे, शेलार मामा आणि अंकुश ढमाले यांनी तातडीने प्रबलित सुरक्षा रेलिंग, वेग नियंत्रक, चेतावणी फलक बसवावेत, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. दरीत सापडलेल्या मृतांची अधिकृत ओळख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. उर्वरित मृतदेहांचा शोध सुरू असून बचाव पथक अतिशय कठीण परिस्थितीत कार्यरत आहे.




