ठाणे : मोटारसायकल खांबावर आदळल्याने झालेल्या अपघातात एका 30 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ठाणे शहरातील घोडबंदर रोडवर आज पहाटेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. मोटारसायकलस्वाराचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ती खांबाला आदळली आणि दुचाकीने पेट घेतला. मीरा रोड भागातील ही व्यक्ती आपल्या मोटारसायकलवरून घोडबंदर रोडवरून ठाण्याच्या दिशेने जात असताना मेट्रो मार्गाच्या एका खांबावर आदळून हा अपघात झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी अपघातग्रस्त व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्याच्या हालचाली सुरू केल्या. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासिन तडवी यांनी सांगितले की, पहाटे 5.30 च्या सुमारास अपघाताबाबत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आली. ते म्हणाले कि, “धडकेमुळे मोटारसायकलला आग लागली आणि ती पूर्णपणे जळून खाक झाली.”
दरम्यान, माहिती मिळताच स्थानिक अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला.




