सोलापूर : सोलापूर-गाणगापूर एसटी बसला अक्कलकोट-मैंदर्गी रस्त्यावर अपघात झाला. या अपघातात ३५ हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे. सकाळी साडे दहाच्या सुमारास अक्कलकोट – मैंदर्गी रस्त्यावरील देशमुख शेतालगत बस पलटी होऊन ही मोठी दुर्घटना घडली. या बसमध्ये जवळपास ७० प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चार ते पाच प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून तातडीने जखमींना जवळपासच्या रुग्णालयांमध्ये हलवण्याचे आदेश दिले आहेत. जखमी प्रवाशांना रुग्णालयांत हलवून शासकीय खर्चाने योग्य त्या उपचारांची व्यवस्था करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. त्याचप्रमाणे अपघातात ज्यांना गंभीर दुखापत झाली आहे, अशा ठराविक किंवा मोठा अस्थिभंग झालेल्या प्रवाशांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५० हजार रुपये अधिकची आर्थिक मदत करण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
अपघात झाल्याचे कळताच मुख्यमंत्र्यांनी सोलापूर जिल्हाधिकारी तसेच एसटी महामंडळ व पोलिसांकडून घटनेची माहिती घेतली व जखमी तसेच इतरही प्रवाशांची व्यवस्था करावी अशा सूचना दिल्या.




