सांगली : भटक्या कुत्र्याने हल्ला केल्याने एका सहा वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. प्रांजली राहुल माळी (वय 6, रा. माळीनगर, कडेगाव) असे या मुलीचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रांजलीचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
कडेगाव येथील माळीनगर परिसरात माळी कुटुंबीयांची शेती आहे. येथेच वस्तीवर राहुल माळी कुटुंबीयांसह राहतात. शुक्रवारी दुपारी ३:३० च्या सुमारास, त्यांच्या मुली अनुष्का व प्रांजली शेजारी असलेल्या मैत्रिणीच्या घरी खेळण्यासाठी निघाल्या होत्या. यावेळी मागून आलेल्या कुत्र्याने प्रांजलीच्या मानेचा व गळ्याचा जोरदार चावा घेतला. त्यामुळे प्रांजली जमिनीवर कोसळली. मुलींची आरडाओरड ऐकून जवळच्या शेतात काम करणारे तिचे वडील मदतीसाठी धावले. तोपर्यंत प्रांजली गंभीर जखमी झाली होती. राहुल व अन्य नातेवाईकांनी तिला तत्काळ कडेगाव ग्रामीण रुग्णालयात व त्यानंतर तिला कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी तिला सातारा सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना मंगळवारी दुपारी तिचा मृत्यू झाला.
कडेगावच्या रहिवाशांनी भटक्या कुत्र्यांच्या दहशतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कारवाई करण्याची मागणी केली आहे. कडेगाव नगरपंचायतीने तात्काळ पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे.