पिंपरी चिंचवड : देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवडमध्ये अटल बिहारी वाजपेयी उद्यानासह इतर विकासकामांचे उद्घाटन होणार होते, त्यासाठी भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे शहरात दाखल झाले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि दुसऱ्या बाजूला भाजपच्या कार्यकर्त्यांचीही गर्दी झाल्यामुळे घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला. याच दरम्यान, एका अज्ञात व्यक्तीने देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनाच्या दिशेने चप्पल भिरकावल्याचा प्रकार घडला आहे.
पिंपळे निलखमधील शहीद अशोक कामटे उद्यानाचे उद्घाटन करून देवेंद्र फडणवीस यांचा ताफा पूर्णानगरच्या दिशेने निघाला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने पूर्णानगर येथील अटल बिहारी वाजपेयी उद्यानाचे काम निकृष्ट दर्जाचं झालं असल्याचा आरोप करत घोषणाबाजी केली. यावेळी एका व्यक्तीने थेट देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनाच्या दिशेने चप्पल भिरकावली. देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याला राष्ट्रवादीकडून झालेल्या विरोधानंतर भाजपचेही कार्यकर्ते आक्रमक झाले. घटनास्थळी तणाव वाढला आणि भाजप व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने आले. त्यामुळे जमावाला पांगवण्याासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. त्यामुळे कार्यकर्ते आणि परिसरात उपस्थित असलेल्या इतर नागरिकांचीही चांगलीच धावपळ उडाली.




