पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीपातींचं राजकारण सुरु झालं आणि त्यांच्यातला परस्पर द्वेष वाढला असं मत काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी व्यक्त केलं होतं. त्यानंतर त्यावर “राज ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरेंचे विचार वाचावेत”, असा खोचक सल्ला शरद पवार यांनी राज ठाकरेंना दिला होता. त्यावरून आता राज ठाकरेंनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे.
शरद पवार यांना प्रत्युत्तर देताना राज ठाकरे म्हणाले कि, “मी जे बोललो त्याचा माझ्या आजोबांच्या पुस्तकांशी काय संबंध होता, हे मला पवार साहेबांनी समजावून सांगावं. मी प्रबोधनकार ठाकरेही वाचलेत आणि यशवंतराव चव्हाणही वाचलेत. एका चॅनलला मी मुलाखत दिली. गेल्या ७५ वर्षांमध्ये आपण काय कमावलं आणि गमावलं याचा उहापोह त्यात होता. मी त्यांना हेच सांगितलं की आपण वैचारिकदृष्ट्या जोपर्यंत प्रगत होत नाही, तोपर्यंत आपल्याकडे कितीही चांगल्या गोष्टी आल्या, तरी आपली प्रगती होणार नाही. आपण वैचारिकदृष्ट्या प्रगत झालो का? या अनुषंगाने माझी भूमिका होती.”
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांनी आज पुण्यातील पत्रकार परिषदेत मांडलेले महत्वाचे मुद्दे : #रोखठोक #पत्रकारपरिषद #pressconference #महाराष्ट्रधर्म #MNS4MAHA @mnsadhikrut @RajThackeray pic.twitter.com/34VSUBMvyL
— MNS For Maharashtra (@mns4maha) August 20, 2021
राज ठाकरे यावेळी म्हणाले, “जात ही गोष्ट हजारो वर्षांपासून आपल्याकडे आहे. १९९९ साल जर आपण पाहिलं, तर त्याआधीपर्यंत राज्यात जातीपाती होत्याच. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर दुसऱ्या जातीबद्दलचा द्वेष जास्त वाढला. हे सगळ्यांना माहिती आहे. सर्व राजकीय पक्षांना माहिती आहे. बोललो फक्त मी. या सगळ्या संदर्भात राज ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरे पुन्हा वाचावेत, याचा अर्थच कळला नाही. माझ्या आजोबांचे अनेक संदर्भ त्या त्या काळातले होते. आपल्याला पाहिजे तेवढंच प्रबोधनकार ठाकरेंचं घ्यायचं, बाकीचं घ्यायचं नाही, असं करता येणार नाही.”
काय आहे प्रकरण?
राज्यातील जातीपातीच्या राजकारणाविषयी बोलत असताना राज ठाकरेंनी राज्यातील जातीपातीच्या राजकारणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार धरलं होतं. “राज्यात जातीचा मुद्दा त्यांच्या त्यांच्या नेत्यांच्या आयडेंटिटीचा मुद्दा झाला आहे. राज्यात जातीचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर मोठा झाला”, असं राज ठाकरे म्हणाले होते. या आरोपावर उत्तर देताना राज ठाकरेंनी त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे लिखाण वाचावे, असा सल्ला शरद पवारांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना दिला होता.




