पुणे : पुण्यात शनिवारी सकाळी, जागतिक महिला दिनाच्या दिवशीच एका तरुणाने दारू पिऊन भररस्त्यात अश्लील वर्तन केले. शास्त्रीनगर चौकात रस्त्यावर एक तरुण लघुशंका करत असल्याचे दिसून आले. त्याला अडवल्यानंतर, त्याने अडवणाऱ्या व्यक्तीसमोर अश्लील हावभाव केले. तर, दुसरा तरूण बीएमडब्ल्यू कारमध्ये दारूची बाटली घेऊन बसला आहे. काही वेळाने, वेगाने गाडी चालवत दोघे पसार झाले. शहरातील गजबजलेल्या शास्त्रीनगर चौकात ही धक्कादायक घटना घडल्याने संतापाची लाट उसळली आहे.
शास्त्रीनगर चौकात BMW कारमधून उतरून एक तरुण रस्त्यावरच लघुशंका करत होता. या तरुणाला तेथे उपस्थित नागरिकांनी हटकल्यानंतर त्याने अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली. नंतर कारमध्ये बसल्यानंतर देखील त्याने निर्लज्जपणे पॅन्ट खाली सरकवत किळसवाणे कृत्य केले. कारमध्ये त्याचा मित्र दारूची बाटली घेऊन बसलेला होता. गजबजलेल्या रस्त्यावर अशा प्रकारचे वर्तन करण्याची हिम्मत कशी होते, हा प्रश्न उपस्थित होत आहे. समाजात राहताना पाळावे लागणारे मूलभूत नियम देखील पायदळी तुडवले जात आहेत.
या घटनेवर स्थानिक नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. एकच मागणी केली जात आहे की अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांविरुद्ध कडक कायदा केला जावा. नागरिकांनी या घटनेच्या संदर्भात पोलिसांकडे त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे, तसेच दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर कडक उपाययोजना करणे आवश्यक आहे.
या घटनेचा व्हिडिओ स्थानिक नागरिकांनी रेकॉर्ड केला होता, जो पोलिसांकडे सादर करण्यात आला आहे. या व्हिडिओमुळे पोलिसांना आरोपींची ओळख पटविण्यासाठी आणि चौकशी करण्यासाठी मदत होईल. पुणे पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, संबंधित आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
तसेच, पुणे शहरातील रस्त्यांवर महिलांच्या सुरक्षेसाठी अधिक कडक उपाययोजना करणे आणि अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी अधिक प्रभावी पाऊले उचलावीत, अशी अपेक्षा स्थानिक नागरिक आणि महिलांच्या हक्कासाठी काम करणाऱ्या संघटनांकडून केली जात आहे.




