मुंबई : मुंबईत मान्सून दाखल झाला असून आठवडाभरापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आज पावसाने विश्रांती घेतली असली तरी ढगाळ वातावरण कायम आहे. हवामान खात्याने राज्यात ४८ तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
आज मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापुर, सातारा व घाटमाथ्यासह संपूर्ण महाराष्ट्र ऑरेंज जारी करण्यात आला. इतकंच नाहीतर आज मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. रायगड आणि रत्नागिरीला मात्र आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, मुंबई उपनगरांसह कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला होता. ९ ते १३ जूनपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस होईल. यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. प्रशासनानेही सतर्क राहत योग्य ती योजना आखावी अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आल्या आहेत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, पालघर आणि अलिबागमध्ये पूर येण्याचा धोका आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, महाबळेश्वर आणि रत्नागिरीसह इतर भागातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. अरबी समुद्राच्या पूर्व-मध्य आणि उत्तरेकडील बाजूने आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्र तयार झाल्यामुळे मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. समुद्राच्या लाटांची उंची 10 मीटरपर्यंत जाऊ शकते, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.




