ठाकरे सरकारला एक वर्ष पूर्ण होतं आहे. खरं तर जनतेच्या अपेक्षांना हरताळ फासल्याचं हे एक वर्ष म्हणावं लागेल. महाराष्ट्राला 25 वर्ष मागे घेऊन जाणारा ठाकरे सरकारचा कारभार आहे आणि मुख्यमंत्र्यांबद्दल तर बोलायचं काम नाही. आठ ते नऊ महिने मंत्रालयात न जाणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राने इतिहासात पाहिला नाही ते काम उद्धव ठाकरेंनी करुन दाखवलंय, अशी टीका भाजप प्रवक्ते माधव भांडारी यांनी केली.
माधव भांडारी यांनी आज नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. तसंच या एक वर्षात केंद्रावर टीका करण्याखेरीज दुसरं कोणतं काम केलं हे सरकारने सांगावं, अशी टीका भांडारी यांनी केली. “आतापर्यंतच्या इतिहासात इतकं अकार्यक्षम सरकार महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलं नव्हतं. महाराष्ट्राने पहिल्यांदाच आठ महिने मंत्रालयात न जाणारा मुख्यमंत्री पाहिला. या एका वर्षात शेतकऱ्यांना दिलासा देण्यात सरकार अपयशी ठरलं. वाढीव वीज बिले देऊन राज्यातील जनतेची लूट केली. कोरोना काळात राज्य सरकारला समाधानकारक कामगिरी करता आली नाही”, असं देखील भांडारी म्हणाले.