नांदेड : हळद शिजवताना कुकरचा स्फोट झाल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. या दुर्घटनेत तीन जण जखमी देखील झाले. या स्फोटात सुनील मारवाड (वय 28) यांचा जागीच मृत्यू झाला. मुखेड तालुक्यातील दापका गुंडोपंत गावात ही घटना घडली.
कच्ची हळद शिजवताना कूकरमधून पाण्याची गळती होऊ लागली. त्यामुळे नक्की काय झाले हे पाहण्यासाठी सुनील कुकरजवळ गेले, त्यावेळी कूकरचा अचानकपणे मोठा स्फोट झाला. या स्फोटात 28 वर्षीय सुनील मारवाड यांचा मृत्यू झाला. तर सुनील यांची पत्नी, त्यांचा 2 वर्षाचा मुलगा आणि अन्य एक मजूर जखमी झाले. जखमींवर उदगीरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.




