मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. परमबीर सिंह यांनी त्यांच्या विरोधातील सर्व चौकशा महाराष्ट्राबाहेरील स्वतंत्र संस्थेकडे सोपवाव्यात, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत परमबीर सिंग यांना कठोर शब्दांत सुनावले आहे.
माजी पोलीस आयुक्त असलेल्या परमबीर सिंह यांनी आपल्याविरोधात करण्यात येणारी चौकशी ही बदला घेण्यासाठी असल्याचे म्हटले आणि याचा तपास महाराष्ट्राबाहेरील स्वतंत्र संस्थेकडे सोपवावा, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयात न्या. हेमंत गुप्ता आणि न्या. व्ही. रामसुब्रमण्यम यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांची याचिका फेटाळत म्हटले की तुम्ही मुंबई उच्च न्यायालयात दाद मागू शकता.