मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. शस्त्रक्रियेपूर्वी कराव्या लागणाऱ्या तपासण्यांतून त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. ते पायाच्या शस्त्रक्रियेसाठी लीलावती रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र, आता राज ठाकरे यांच्या पायावरची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. आज (१ जून) त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया होणार होती.
राज ठाकरे हे ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र, पायाचे दुखणे बळावल्याने त्यांना अयोध्या दौरा रद्द करावा लागला होता. त्यानंतर राज ठाकरे यांच्या पायावर आज शस्त्रक्रिया होणार होती. मात्र आता कोरोनातून बरे झाल्यानंतर शस्त्रक्रिया करणार येणार आहे. राज ठाकरे यांना याअगोदरही २३ ऑक्टोबर २०२१ रोजी कोरोनाची लागण झाली होती. सौम्य लक्षणे असल्याने राज यांनी त्यावेळी घरीच उपचार घेतले होते.
कोविड डेड सेलमुळे ऍनेस्थेशिया देऊ शकत नसल्यामुळे लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मनसेचे सचिव सचिन मोरे यांनी दिली आहे.




