मुंबई : ठाणे महापालिका प्रशासनाने शहरातील पदपथ आणि रस्ते अडविण्याऱ्या फेरीवाल्यांविरोधात मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार, महापालिकेच्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या पथकामार्फत सोमवारी कारवाई सुरू होती. यावेळी कल्पिता पिंपळे यांच्यावर एका फेरीवाल्याने जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात कल्पिता पिंपळे यांची तीन बोटे कापली गेली असून त्यांच्या दुसऱ्या हाताला आणि डोक्यावर देखील जबर मार लागला आहे. पिंपळे यांच्या अंगरक्षकाच्याही डाव्या हाताचे बोट कापले गेले आहे. या प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी पिंपळे यांच्या पथकाने कासारवडवली येथील बाजारपेठेत भाजीविक्रेता अमरजीत यादव याची गाडी जप्त केली. त्यानंतर अमरजीत याने पिंपळे यांच्या पाठीमागून येऊन त्यांच्या डोक्यावर सुऱ्याने वार करण्याचा प्रयत्न केला. हा हल्ला वाचविण्यासाठी पिंपळे यांनी सुरा पकडला. मात्र, त्यावेळी त्यांच्या डाव्या हाताची तीन बोटे कापली गेली. पिंपळे यांच्या बचावासाठी गेलेल्या त्यांच्या अंगरक्षकावरही अमरजीतने हल्ला केला. यात त्याच्याही डाव्या हाताचे बोट कापले गेले. पोलिसांनी या फेरीवाल्याला ताब्यात घेतले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणावर संताप व्यक्त करत म्हटलं कि, “महिला अधिकाऱ्यावर हल्ला करणारा आरोपी पोलिसांकडून जेव्हा सुटेल तेव्हा आमच्याकडून मार खाईल. यांची मस्ती उतरवली पाहिजे. ह्यांची जेव्हा सगळी बोटं छाटली जातील आणि यांना फेरीवाला म्हणून फिरता येणार नाही तेव्हा त्यांना कळेल. अशा प्रकारे अधिकाऱ्यावर हल्ला करण्याची हिंमत कशी होते यांची? आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो. काही लोक सुधारणारे नाहीत. यांची हिंमत ठेचलीच पाहिजे. सरकारी अधिकाऱ्याची बोटं छाटता? आज अटक झाली आहे उद्या जामीन मिळेल. परत दुसऱ्याची बोटं तोडायला बाहेर येतील.”
या घटनेनंतर पोलिसांनी अमरजीतला ताब्यात घेतले. त्यानंतर महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात अमरजीत विरोधात तक्रार नोंदविली.




