मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. किरीट सोमय्या यांचे पुत्र नगरसेवक नील सोमय्या यांना एका जुन्या खंडणीप्रकरणी पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. काल मुलुंड पोलिसांकडून नील सोमय्या यांचा या गुन्हासंदर्भात जबाब नोंदवण्यात आला. जवळपास तीन तास त्यांची चौकशी करण्यात आली.
2020 साली जानेवारी महिन्यात एका मोठ्या कॉर्पोरेट कंपनीने आपल्या दोन टॉवर्सचं काम एका खाजगी ठेकेदाराला दिलं होतं. नील सोमय्या यांच्याशी संबंधित काही लोकांनी ठेकेदाराला नील सोमय्या यांच्या ऑफिसमध्ये बोलावून धमकावून एका टॉवरचं काम त्याच्याकडून काढून घेतलं. काही दिवसांनी नील सोमय्या यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा त्या ठेकेदाराला बोलावलं आणि धमकी देत त्याच्याकडून दुसऱ्या टॉवरचं कामही दे नाहीतर त्याबदल्यात आम्हाला फ्रॉफिट दे असं सांगितलं.
याप्रकरणी गेल्या वर्षी जानेवारीमध्ये खंडणीचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. अशातच एका वर्षानंतर मुलुंड पोलिसांनी पुन्हा एकदा याप्रकरणी नील सोमय्या यांना समन्स बजावत चौकशीसाठी बोलावलं होतं. नील सोमय्या यांची तीन तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांचा जबाबही नोंदवण्यात आला. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तीन लोकांना अटकही केली आहे.