मुंबई : महाराष्ट्रात मागील २४ तासांत ८,०६७ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या आणि ओमिक्रॉन विषाणूचा संसर्ग वाढत असल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात ओमिक्रॉन रुग्णांची संख्याही ४५४ झाली आहे. आरोग्य विभागाकडून ही आकडेवारी जारी करण्यात आली आहे.
मुंबई, ठाणे, पुणे येथे कोरोना रुग्ण संक्रमण दर वाढत आहे. आज राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. गेल्या २४ तासांत ८,०६७ नवीन रुग्णांचे निदान झाल्यामुळे आरोग्य प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर निर्बंध लागू केले आहेत. तसंच, लग्न तसेच अन्य कार्यक्रमांसाठी हॉलमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी काटेकोर उपाययोजना करण्याबतचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.




