मुंबई : महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानसभेच्या बाहेर गुरुवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याविरोधात जोरदार निदर्शने केली. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप आमदारांनी केला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनेही निदर्शनाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये आमदार राज्यपालांच्या विरोधात घोषणाबाजी करताना दिसले.
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस वादळी ठरला. अधिवेशनाची सुरुवात प्रथेप्रमाणे राज्यपाल किंवा राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने होते. त्यानुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी गुरुवारी अभिभाषणासाठी विधिमंडळात आले होते. मात्र, भाषण वाचायला सुरुवात केल्यानंतर अवघ्या २२ सेकंदात राज्यपाल भाषण अर्धवट टाकून आल्या पावली माघारी परतले. राज्यपालांच्या अभिभाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख आल्यानंतर महाविकासआघाडीच्या आमदारांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली. त्यामुळेच राज्यपाल भाषण पूर्ण न करताच निघून गेले, अशी चर्चा सुरु आहे.
राष्ट्रवादीच्या आमदारांनी आंदोलनात ठिय्या मांडला
निदर्शनादरम्यान राष्ट्रवादीचे आमदार संजय दौंड डोक्यावर उभे राहिले. घोषणाबाजीच्या गडबडीत दौंड पायऱ्यांवरून उतरून शीर्षासन करू लागले. दुसरीकडे शिवसेना नेते मनीष कायंदे यांनी राज्यपालांवर निशाणा साधत ते काय संदर्भ देत आहेत? त्यांना हे सांगायची गरज नव्हती. मला वाटते की ते भाजपसोबत आहेत आणि त्यांनी अधिवेशनाच्या मध्यावर हा वाद उभा केला आहे.
#WATCH | Maha Vikas Aghadi (MVA) MLAs shout slogans and protest against Governor Bhagat Singh Koshyari over his alleged controversial remarks over Chhatrapati Shivaji Maharaj.
NCP MLA Sanjay Daund did a ‘sheershasan’ in protest. pic.twitter.com/txeSgZCNgC
— ANI (@ANI) March 3, 2022
सभागृहात नेमकं काय घडलं?
राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. २०२२ वर्षातील राज्य विधानमंडळाच्या पहिल्या अधिवेशात मी तुमचं स्वागत करतो, असे राज्यपालांनी म्हटले. त्यानंतर राज्यपालांनी माझे शासन छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्या आशीर्वादाने, असे शब्द उच्चारताच महाविकासआघाडीच्या आमदारांनी घोषणा देत गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अनपेक्षितपणे आपले भाषण आवरते घेतले आणि त्यानंतर सभागृहातून काढता पाय घेतला.




