मुंबई : राज्याच्या अनेक भागामध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे, पुढील 24 तासांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
आज पुणे, कोकण, मुंबई आणि रायगडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, घाटमाथा आणि कोकण या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्याचबरोबर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ याठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
‘या’ जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट
हवामान विभागाने पुणे, रायगड,ठाणे, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. जळगाव, नाशिक, नंदुरबार, धुळे, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, वाशीम, जालना, बीड, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
पुणे शहरात मुसळधार पाऊस
पुणे शहरात काल दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. स्वारगेट, टिंबर मार्केट, गोळीबार मैदान, शिवाजीनगर, लोहगाव, पाषाण, चिंचवड, लवळे या भागात जोरदार पाऊस झाला. तसेच कात्रज, सिंहगड रस्ता, कर्वे रस्ता, विद्यापीठ रस्ता, औंध, पाषाण, बाणेर या भागातही मुसळधार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची मोठी तारांबळ उडाली.
पुणे शहरासह घाटमाथ्यावर मान्सून सक्रिय झाला आहे. त्यामुळे कमी काळात मोठा पाऊस होत असल्याची माहिती हवामान मिळाली आहे. शहराला 23 व 26 या दिवशी येलो, तर 24 व 25 रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.




