ठाणे: राज्य कोरोनाच्या संकटाशी झुंजत असतानाच दुसरीकडे रुग्णालयांमध्ये होत असलेल्या दुर्घटनांचे प्रमाणही वाढले आहे. नागपूर, मुंबई, नाशिक येथील रुग्णालयात झालेल्या दुर्घटनांच्या आठवणी विस्मृतीत जात नाही. मुंब्रा कौसा येथील प्राइम क्रिटीकेअर या हॉस्पिटलला लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला आहे. या रुग्णालयात एकूण 26 रुग्ण होते. यामध्ये 6 रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते.
मिळालेल्या माहिती नुसार, मुंब्रा येथे जुन्या मुंबई-पुणे रोडवरील शिमला पार्क परिसरात असलेल्या हसन टॉवरमध्ये पहिल्या मजल्यावर प्राईम क्रिटीकेअर हॉस्पिटल आहे. या रुग्णालयात बुधवारी पहाटे आगीचा भडका उडाला. पहाटे ३ वाजून ४० मिनिटाच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी रुग्णालयात २० रुग्ण उपचार घेत होते. यात आयसीयू वार्डात ६ रुग्ण, तर इतर वार्डात १४ रुग्ण होते. आग लागल्याची माहिती मिळताच मुंब्रा पोलीस, रुग्णावाहिका, अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आयसीयूमधील रुग्णांना तातडीने बिलाल रुग्णालयात हलविण्यात आलं. तर इतर रुग्णांना सुटी देण्यात आली. या घटनेत चार रुग्णांना आपला जीव गमावावा लागला आहे. रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जात चार रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती ठाणे महापालिका प्रशासनाने दिली आहे.
मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बोलताना सांगितलं की, काही वेळापूर्वी ठाण्याती मुंब्रा येथील प्राईम क्रिटिकेअर रुग्णालयाला मध्यरात्री भीषण आग लागली. याचं कारण अद्याप कळालेलं नाही. आतापर्यंत या आगीत काही रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. यासंदर्भात अधिकृत माहिती पोलीस थोड्या वेळात जाहीर करतील. या रुग्णालयातील रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आलं आहे. आयसीयूमध्ये 6 रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यापैकी काही रुग्ण गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु होते.
आग नेमकी कशी लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. शॉर्टसर्किटमुळं ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
मुंब्रा येथील prime hospital ला रात्री 3 वाजता आग लागली आगी चे कारण समजू शकले नसले तरी शॉर्ट सर्किट मुळे लागल्याचा संशय आहे. 3 जणांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मदत कार्य चालू असून आग आटोक्यात आली आहे
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 28, 2021




