मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तसेच पूजाच्या आत्महत्येशी विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याचं बोललं जात आहे. चंद्रकांत पाटील यांनीसुद्धा पूजा चव्हाण प्रकरणात महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला होता. त्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी चौकशी होऊ द्या, चौकशीनंतर काय ते समोर येईल, असं म्हणत अजित पवारांनी भाजपवर पलटवार केला. अजित पवार पुढे बोलताना म्हणाले कि, ”एखाद्या नेत्याला राजकीय उंची गाठण्यासाठी बराच काळ-वेळ घालवावा लागतो, कष्ट घ्यावे लागतात, परिश्रम करावे लागतात. परंतु आरोप करणारा कशाही पद्धतीने आरोप करू शकतो. मग त्याही खोलात गेलं पाहिजे. चौकशी पूर्ण होण्याच्या आधी काही लोक आरोप करतात. त्याला काही अर्थ नाही.
धनंजय मुंडेंवर ज्यांनी आरोप केला. त्यांनी नंतर स्वतः चॅनेलसमोर येऊन मी कुठल्याही दबावाला बळी न पडता माझं स्टेटमेंट करतेय, असं सांगितलं. मग पहिल्यांदा त्यांनी जेव्हा आरोप केला, तेव्हा त्यांना मुद्दामहून आरोप करायला भाग पाडलं होतं का?, असे बरेच प्रश्न त्याच्यातून निर्माण होऊ शकतात. धनंजय मुंडेंचं प्रकरण आता मिटलं आहे. पण पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पोलीस विभागाकडून चौकशी सुरू आहे. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी चौकशी होऊ द्या, चौकशीनंतर काय ते समोर येईल, असंही अजित पवार म्हणाले आहेत.




