मुंबई : अरबी समुद्रात पुन्हा एकदा हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. पुढील एक-दोन दिवसांत याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता असून पुढील काही दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. किनारपट्टी व आतल्या भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. पुढील पाच दिवस हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढत असून किनारपट्टीवर वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 19 नोव्हेंबरनंतर याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता असून किनारपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील काही तासांत वाऱ्याची गती वाढण्याची शक्यता आहे.
17 Nov:
अरबी समुद्रात निर्माण कमी दाबाचे क्षेत्र व संबंधित सिस्टिम मधून कोकण किनारपट्टी मध्ये द्रोणीय स्थिती. परिणामी किनारपट्टी व आतल्या भागात ढगाळ वातावरण. क.दा.क्षे. 48 तासात किनारपट्टी पासून दूर जाऊन अजून दाट होण्याची शक्यता.17-21 Nov राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. pic.twitter.com/erBaLEoKv7
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) November 17, 2021
मध्य पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून रायगड आणि रत्नागिरी येथे गडगडाटी ढग दिसत असून आतल्या भागातही ढगांची दाटी दिसत आहे. हवामान खात्याने आज मुंबई, ठाणे, नाशिक, पालघर, पुणे, अहमदनगर, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात आजपासून पाच दिवस मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.




