हिंगोली : हिंगोली ते औंढा नागनाथ रस्त्यावरील दिग्रस फाट्याजवळ शनिवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. हिंगोलीकडून औंढा नागनाथच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारने त्याच दिशेने जाणाऱ्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला, मात्र कारमधील एअर बॅग उघडल्याने कारमधील चौघे सुखरूप बचावले.
मिळालेल्या माहितीनुसार, बोरजा येथील ट्रॅक्टरचालक हिंगोली येथून गावाच्या दिशेने जात असताना पाठीमागून कारने धडक दिली. या अपघातात ट्रॅक्टरचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अपघात घडल्यानंतर स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. भरधाव कार चालवल्याने जमावाकडून मारहाण होण्याच्या भीतीने कारचालकासह इतर प्रवाशांनी अपघातस्थळावरून पळ काढला. त्यामुळे कारमध्ये असलेल्या व्यक्तींची नावे कळू शकली नाहीत.




