नागपूर : डोक्यावर खलबत्ते आणि हातात चिमुकले बाळ घेऊन जगण्यासाठी संघर्ष करणारी महिला जिद्दीने पोलिस उपनिरीक्षक झाली ही पोस्ट सध्या व्हायरल झाली आहे. संघर्ष करून ती पोलिस उपनिरीक्षक झाली. पण, तिने खलबत्ते विकले नाहीत. मी ती नाही. मी खलबत्ते, वरवंटे विकण्याचे काम कधीच केले नाही असे खुद्द पद्मशीला तिरपुडे यांनी बोलताना स्पष्ट केले. तिरपुडे या आता सहाय्यक पोलिस निरीक्षक असून नागपूर जिल्ह्यात कार्यरत आहेत.
माझा भूतकाळ आणि संघर्ष चुकीच्या पद्धतीने मांडला जात आहे. चुकीचा समज पसरविणाऱ्या समाजाकडे कसे बघावे, हा प्रश्नच पडतो’, अशी खंत व्यक्त करणाऱ्या मूळ भंडारा जिल्ह्यातील तिरपुडे स्वत:च्या वाटचालीविषयी सांगताना म्हणाल्या, ‘तो संघर्षाचा काळ होता. घरची स्थिती अत्यंत बेताची होती. प्रेमविवाह केला होता. परंतु, मनात दृढ निश्चय होता. आम्ही नाशिक येथे राहू लागलो. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात पदवीचे शिक्षण घेत असताना स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. २००७ ते २००९ या वर्षांत पदवी शिक्षण घेतले. २०१२ मध्ये मुख्य स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केली. २०१३ साली नाशिकच्या प्रशिक्षण संस्थेतून पोलिस उपनिरीक्षक म्हणून पासआउट झाले. त्यावेळी कुटुंबीयांसोबतचा एक फोटो काढला. व्हायरल झालेला फोटो तो हाच. यात सासू, पती आणि मुलांसोबत मी गणवेशात आहे. हा फोटो माझाच आहे. नंतर माझ्या या फोटोसोबत खलबत्ते विकणाऱ्या त्या महिलेचा फोटो जोडून माझी संघर्षकहानी म्हणून सांगितले जाऊ लागले. ती महिला माझ्यासारखी दिसते एवढाच काय तो योगायोग!