पुणे : लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव ही संकल्पना भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी समोर आणली. सर्व भारतीय लोकांनी आपसातले भेद सोडून एकत्र यावे ही लोकमान्य टिळकांची मुख्य इच्छा होती. मात्र, अलीकडच्या काळात लोकमान्यांनी उदात्त हेतूने सुरू केलेल्या या उत्सवाला वेगळेच स्वरूप प्राप्त झाले आहे. प्रत्येक गल्लीत वेगळा गणपती पाहायला मिळतो, मंडळामध्ये वाद पाहायला मिळतात. प्रत्येक गल्लीत मंडळांची संख्या वाढल्याने लोक एकत्र येण्याऐवजी विभागले गेले. काही गणेशोत्सव मंडळांची ‘वर्गणी’, ही वर्गणी असते की ‘वसुली’ हेच कळत नाही. काही मंडळे दरवर्षी मोठमोठी मंदिरे उभारून दहा दिवसांनी ती तोडून टाकतात, त्यासाठी किती तरी लाख रुपये खर्च होतात.
गणेशोत्सवातून समाजप्रबोधन व्हावे, हाही लोकमान्यांचा उद्देश होता. त्या अनुषंगाने काही सांस्कृतिक कार्यक्रम होत. कलाकाराच्या कलागुणांना वाव देऊन, सर्वसामान्यांच्या ज्ञानात भर पडेल असे उपक्रम राबविले जात. वक्त्यांना गणेशोत्सवाच्या निमित्ताने व्यासपीठ उपलब्ध करून, व्याखानमाला आयोजित केल्या जात असत. आजही ही प्रथा अव्याहतपणे चालू ठेवणारी अनेक गणेशोत्सव मंडळे आहेत; परंतु त्यामध्ये वाढ झाली पाहिजे.
लोकांनी स्व-इच्छेने दिलेल्या वर्गणीचा स्वीकार करायला हवा. मंडळाला मिळालेल्या वर्गणीतून एक हिस्सा सामाजिक कार्यासाठी खर्च करावा. मिळालेल्या व खर्च केलेल्या सर्व पैशाचा हिशोब जाहीर करायला हवा. गणेशोत्सवातील विविध प्रकारच्या जाहिरातबाजी व नेत्यांच्या, अभिनेत्यांच्या पोस्टरबाजी वर बंदी आणायला हवी. शिस्तबद्ध वातावरणात विसर्जन मिरवणुक झाली पाहिजे. विसर्जनाच्या मिरवणुकीत पारंपारिक वाद्यांचा वापर केला पाहिजे. विसर्जनाच्या मिरवणुकीची कालमर्यादा तर कधीचीच ओलांडली आहे.
पारी टॉवर्स सोसायटीमध्ये गणरायाच्या आरतीचा अनोखा उपक्रम…
लोकांनी एकत्र यावे व गणरायाची सेवा करावी ही संकल्पना समोर ठेऊन पारी टॉवर्स सोसायटीमधील काही तरुणांनी एक उपक्रम राबवला. पारी टॉवर्स सोसायटीमधील ६०-७० महिला व पुरुष रोज सायंकाळी एकत्र येतात व मजल्यानुसार प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या फ्लॅट धारकांकडे आरतीला जातात व सामूहिक आरती करतात. बाप्पाचे विसर्जन होईपर्यंत या आरत्या अशाच सुरु राहतील. सोसायटीमधील लोकांशी बोलल्यानंतर त्यांनी सांगितले कि आमची सोसायटी नवीन आहे, अनेकजण एकमेकांना ओळखत नाहीत, तर या निमित्ताने सर्व फ्लॅटधारक एकमेकांच्या घरी जातात, एकमेकांशी ओळखी वाढतात. तसेच गणरायाची मनोभावे सेवा होते. ज्यांच्या घरी आरती असते, त्यांच्यासाठी हा उत्सव दिवाळीपेक्षाही मोठा असतो, ते सर्वांचे मनापासून स्वागत करतात आणि सर्वजण मिळून गणरायाची आरती करतात. त्यामुळे आमच्यातील एकजूट नक्कीच वाढेल व गणरायाची मनोभावे सेवाही होईल. दहा दिवस गणरायाची सेवा करून आम्ही सर्व गणरायांना विसर्जनाच्या दिवशी विसर्जित करू व गणरायाची पुन्हा वाट पाहू व नवीन काहीतरी उपक्रम राबवू.
गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया!