भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू सुरेश रैना याच्यावर मुंबई पोलिसांनी कारवाई केली असून अटक केल्यानंतर जामीनावर सुटका केली. ड्रॅगनफ्लाय नाईट क्लबवर मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली तेव्हा सुरेश रैनादेखील तिथे उपस्थित होता. पोलिसांनी ३४ जणांना अटक केली, यामध्ये सुरेश रैनासहीत अनेक सेलिब्रेटींचाही समावेश होता.
पोलिसांच्या कारवाईवर सुरेश रैनाने प्रतिक्रिया दिली आहे. सुरेश रैनाच्या मॅनेजमेंट टीमकडून निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. त्याच्या टीमकडून सांगण्यात आलं कि, “सुरेश रैना एका शूटसाठी मुंबईत होता, ज्याची वेळ नंतर पुढे वाढली. सुऱेश रैना रात्रीच्या विमानाने दिल्लीला निघणार होता त्यापूर्वी मित्राने त्याला डिनरसाठी बोलावलं होतं. त्याला स्थानिक वेळा आणि प्रोटोकॉलची माहिती नव्हती. माहिती मिळाल्यानंतर त्याने लगेचच त्याची काळजी घेतली. दुर्दैवी घटनेबद्दल त्याने खेद व्यक्त केला आहे. सुरेश रैना नेहमीच प्रशासनाने दिलेल्या नियमांचं पालन करत असून भविष्यातही करत राहील.”




